रत्नागिरी : कृषीदिनानिमित्त सन २०२३ व २०२४ या वर्षांमधील डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण यांसह विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईत नुकतेच पार पडले.
या सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण ६ जणांना सन्मानित करण्यात आले असून, यात सन २०२३ मधील दोन आणि २०२४ मधील चार पुरस्कारार्थींचा समावेश आहे.

या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी सचिव परिमल सिंह आणि कृषी आयुक्त सुरज मांढरे उपस्थित होते.
या सोहळ्यात सन २०२३ करिता ठाणे विभागातून राजापूर तालुक्यातील ओणी येथील डॉ. शैलेश सुभाषचंद्र शिंदेदेसाई यांना एक लाख वीस हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र स्वरूपाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच चिपळूण तालुक्यातील मांडकी येथील अनंत बाबाजी खांबे यांना ४४ हजार रुपये, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्रासह वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने (सर्वसाधारण गट) गौरविण्यात आले.
सन २०२४ च्या पुरस्कारांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील आनंद जयंत देसाई यांना दोन लाख रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र स्वरूपाचा वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच रत्नागिरीतीलच नेवरे येथील पत्रकार मेहरुन हमीद नाकाडे यांना एक लाख वीस हजार रुपयांचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देण्यात आला.
याशिवाय चिपळूण तालुक्यातील भिले येथील धनंजय श्रीकृष्ण केतकर यांना एक लाख रुपये स्वरूपाचा उद्यान पंडित पुरस्कार आणि राजापूर तालुक्यातील खरवते-गावठाणवाडी येथील दयानंद बाबाजी चौगुले यांना ४४ हजार रुपये स्वरूपाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) देऊन गौरवण्यात आले आहे.

