दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याचे नाव थेट सातासमुद्रापार झळकले आहे. दापोलीची सुकन्या प्राजक्ता (सारा) भांबुरे-बोंगाळे हिने अमेरिकन सैन्यात भरती होऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

अमेरिकन सैन्यात दाखल होणारी ती पहिली मराठी महिला ठरली असून, तिच्या या यशामुळे दापोली आणि कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान उंचावला आहे.

लहानपणापासूनच शिस्तबद्ध जीवन आणि सैन्यदलाविषयी आकर्षण असलेल्या प्राजक्ताने सैनिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते.

या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी तिने सातत्याने शारीरिक तंदुरुस्ती, शैक्षणिक प्रगती आणि कठोर प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले.

अनेक आव्हानांचा समर्थपणे सामना करत तिने अमेरिकन सैन्याच्या अत्यंत कठीण निवड प्रक्रियेत यश मिळवले आणि त्यानंतरचे खडतर प्रशिक्षणही यशस्वीरीत्या पूर्ण केले.

सध्या प्राजक्ता अमेरिकन सैन्याच्या मेडिकल विभागात कार्यरत आहे. विशेष म्हणजे, प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट नेमबाजीचे कौशल्य सिद्ध करत तिने प्रतिष्ठेचे ‘मार्क्समन शिप’ पदकही पटकावले आहे.

इतकेच नव्हे, तर संपूर्ण प्रशिक्षणात सर्वाधिक शैक्षणिक गुण मिळवून तिने आपल्या बुद्धिमत्तेची आणि गुणवत्तेची वेगळी ओळख निर्माण केली.

प्राजक्ताचा हा प्रवास केवळ सैन्य क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर यापूर्वी तिने मॉडेलिंग क्षेत्रातही यश मिळवत आपले बहुआयामी व्यक्तिमत्त्व सिद्ध केले आहे.

मात्र, शिस्तबद्ध जीवनाच्या ओढीने तिला अखेर अमेरिकन सैन्यापर्यंत नेले. कोकणातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने आपल्या जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर जागतिक दर्जाच्या सैन्यदलात मिळवलेले हे यश तरुणाईसाठी एक मोठे प्रेरणास्थान ठरले आहे.