रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज, १ जुलै रोजी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच २ जुलै ते ५ जुलै या कालावधीत जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.
घाटावर आणि कोकणात या काळात दरडी कोसळण्याचा तसेच सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा मोठा धोका आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
विजा चमकत असताना नागरिकांनी टीव्ही, संगणक यांसारखी विद्युत उपकरणे बंद ठेवून ती मुख्य स्रोतापासून वेगळी करावीत, तसेच लँडलाईन आणि मोबाईलचा वापर टाळावा, असे प्रशासनाने म्हटले आहे.
या काळात घराबाहेर पडू नये आणि बाहेर अडकल्यास सुरक्षित इमारतीचा किंवा पक्क्या घराचा आश्रय घ्यावा. विजेचे खांब, उंच झाडे आणि धातूच्या वस्तूंपासून लांब राहावे आणि मोकळ्या परिसरात असल्यास गुडघ्यांमध्ये डोके घालून वाकून बसावे.
वीज पडण्याची पूर्वसूचना मिळवण्यासाठी नागरिकांनी मोबाईलवर ‘दामिनी ॲप’ (Damini App) डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अतिवृष्टीच्या काळात घाट रस्त्यांवरून प्रवास करणे, विशेषतः रात्रीच्या वेळी अत्यंत धोकादायक ठरू शकते, त्यामुळे अत्यावश्यक कारणाशिवाय असा प्रवास टाळावा. डोंगराच्या पायथ्याशी, उतारावर किंवा दरडप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सततच्या पावसात विशेष खबरदारी घ्यावी आणि दरडीची पूर्वचिन्हे दिसल्यास तात्काळ प्रशासनाच्या निवारण केंद्रात स्थलांतर करावे.
घराच्या परिसरातील गटारे आणि नाले अडथळामुक्त ठेवावेत, जेणेकरून पाण्याचा निचरा सुरळीत होऊन माती सैल होण्याचे प्रमाण कमी होईल.
जमिनीत भेगा पडणे, झाडे किंवा वीजखांब कलणे, भिंतींना तडे जाणे किंवा पाण्याच्या प्रवाहात अचानक बदल होणे यांसारखी पूर्वलक्षणे दिसल्यास नागरिकांनी तात्काळ ग्रामपंचायत, महसूल, पोलीस किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती द्यावी. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे आणि पाण्यातून किंवा पुरातून पायी अथवा वाहनाने प्रवास करण्याचा धोका पत्करू नये.
प्रवासाला निघण्यापूर्वी हवामान, रेल्वे व रस्ते वाहतुकीची अधिकृत माहिती घ्यावी. या कालावधीत मच्छीमारांनी समुद्र किंवा खाडी किनाऱ्यावर मासेमारीसाठी उतरू नये, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि हवामानाची अधिकृत माहिती भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

