रत्नागिरी : शहरातील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूलमध्ये नुकताच २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावर्षी शाळेने दहावीच्या (एसएससी) परीक्षेत १०० टक्के निकालाची उज्ज्वल कामगिरी नोंदवून आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
या परीक्षेसाठी शाळेतून एकूण १३० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तब्बल ७० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह (डिस्टिंक्शन) यश मिळवले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांपैकी ४५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, १४ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी, तर एका विद्यार्थ्याने उत्तीर्ण श्रेणी मिळवली आहे.
शाळेच्या या घवघवीत यशामध्ये सृष्टी होतेकर, मिहीर काणेकर आणि हर्ष जांगले या विद्यार्थ्यांनी पहिल्या तीन क्रमांकांवर झेप घेत विशेष चमक दाखवली.
या दिमाखदार सत्कार सोहळ्यात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे शाळेतर्फे विशेष कौतुक करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम आणि त्यांना लाभलेले शाळा व्यवस्थापन तसेच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे मोठे यश साकार करता आले, अशी प्रतिक्रिया शाळेच्या मुख्याध्यापिका जॉयलेट परेरा यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.
या सोहळ्याला आफ्रा, कविता यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण बॅचचे आणि शिक्षकांचे रत्नागिरी शहरात कौतुक होत आहे.

