रत्नागिरी: बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन आणि झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या औचित्यावर मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये सकाळच्या सत्रात योग प्रशिक्षणाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमातून सर्वांगीण आरोग्यासाठी योगासनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमधील सहाय्यक प्राध्यापक आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक निलेश मिरजकर यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योगासनांचे मार्गदर्शन केले.
गेल्या दहा वर्षांपासून योगा आणि ध्यानाचे प्रशिक्षण देणाऱ्या निलेश मिरजकर यांनी विविध योगासने, ध्यान आणि प्राणायामाच्या क्रिया प्रत्यक्ष करून दाखवल्या. सर्व उपस्थितांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून योगासने केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य केतन चौधरी यांनी दैनंदिन जीवनात योगाचे आणि सूर्यनमस्कारांचे अनन्यसाधारण महत्त्व विशद केले. नियमित योगाभ्यासाने मानसिक शांतता आणि शारीरिक आरोग्य कशा प्रकारे उत्तम राहते, यावर त्यांनी भर दिला.
शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याविषयी जनजागृती करणे हा योग दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक राजेश ठोकळ आणि संशोधन संचालक प्रशांत शहारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या सोहळ्याला दोन्ही संस्थांचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे सहाय्यक संशोधन अधिकारी मनोज घुघुसकर, सचिन साटम यांच्यासह मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे राकेश जाधव, तौसीफ काझी, मयुरी डोंगरे, सुशिल कांबळे, सचिन पावसकर, सुरेश हातगळे, सिद्धेश कांबळे, अभिजित पाटील, अभिजित शिरगावकर, प्रविण भाटकर आणि प्रविण गायकवाड यांनी उपस्थित राहून सहभाग घेतला.

योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य भेट असून, २१ जूनच्या वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचे निसर्गात व उत्तर गोलार्धात विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ एक उत्सव नसून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याची चळवळ आहे व स्वतःच्या आरोग्यासाठी दररोज थोडा वेळ काढणे आवश्यक आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

