दापोली : तालुक्यातील वाढत्या वीज समस्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य वीज सुधारणा कंपनीचे संचालक विश्वास फाटक यांची मुंबई येथे भेट घेतली. या बैठकीत दापोलीच्या वीज पुरवठ्याशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, दापोलीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या प्रस्तावित १३२ केव्ही वीज उपकेंद्राच्या उभारणीबाबत सकारात्मक पावले उचलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

बैठकीदरम्यान दापोली तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, कमी दाबाने मिळणारी वीज, वाढत्या वीज मागणीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि विशेषतः पावसाळ्यात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे संचालक विश्वास फाटक यांचे लक्ष वेधण्यात आले.

दापोलीतील नागरिकांना आणि उद्योग-व्यवसायांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावर विश्वास फाटक यांनी प्रस्तावित १३२ केव्ही उपकेंद्राचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची सकारात्मक भूमिका घेतली. महापारेषण विभागामार्फत हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

हे प्रस्तावित १३२ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर तालुक्यातील वीज दाब स्थिर राहण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी कमी होऊन भविष्यातील वाढती वीज मागणी पूर्ण करणे अधिक सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या प्रकल्पामुळे नागरिक, शेतकरी, व्यावसायिक तसेच औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीस केदार साठे, सचिन तोंडणकर, दीपक विचारे, विवेक भावे, पप्पा जाधव आणि विराज खेत उपस्थित होते. या चर्चेमुळे दापोलीतील वीज समस्यांवर दीर्घकालीन तोडगा निघण्याची दापोलीकरांना अपेक्षा आहे.