दापोली : राज्यभर पाऊस लांबणीवर गेल्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप वरुणराजाने हजेरी न लावल्याने बळीराजासह सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत.
अशा परिस्थितीत निसर्गाचा कोप शांत व्हावा आणि लवकरात लवकर समाधानकारक पर्जन्यवृष्टी व्हावी, या आशेने दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील गोडबोले आळीतील भक्तांनी थेट सिद्धिविनायकाला साकडे घातले आहे.

पावसासाठी देवाचा धावा करत या भक्तांनी गणपती अथर्वशीर्षाची आवर्तने केली आणि सलग २४ तास जलाभिषेक करत विशेष अनुष्ठान पार पाडले.
काल सकाळच्या सुमारास या धार्मिक अनुष्ठानाला सुरुवात करण्यात आली होती. संपूर्ण दिवस आणि रात्रभर भाविकांनी भक्तीभावाने जलाभिषेक सुरू ठेवला होता. अखेर आज दुपारी या २४ तासांच्या अखंड अनुष्ठानाची विधिवत सांगता करण्यात आली.
सध्या लांबलेल्या पावसामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पावसासाठी शेवटी अशा प्रकारे गावोगावी देवांना साकडे घालण्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

