स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी… भाग – 8

ट्रेकच्या दुसऱ्या दिवशी 2610 मीटरवर असणाऱ्या #फाकडिंग येथून ‘नामचे’कडे येताना, दूधकोसी नदीच्या काठा-काठाने आम्ही सर्वजण निघालो होतो. या खळाळत्या नदीवर एकूण चार झुलते पूल लागले. परंतु, सर्वात शेवटचा हिलरी पूल हा लक्षात राहणारा ठरला. हिलरीसस्पेंशनब्रिज #hillarysuspensionBridge) हा अत्यंत प्रसिद्ध आणि थरारक झुलता पूल आहे.

माउंट एव्हरेस्टवर सर्वात आधी पाऊल ठेवणारे न्यूझीलंडचे महान गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ या पुलाचे नामकरण करण्यात आले आहे. सर एडमंड हिलरी यांनी या भागातील स्थानिक शेर्पा समुदायाच्या विकासासाठी आणि येथील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले होते.

हा पूल नेपाळच्या सागरमाथा राष्ट्रीय उद्यानात लारजा दोभान या ठिकाणी आहे. आम्ही जेव्हा #फाकडिंग #Phakding कडून शेर्पांची राजधानी मानल्या जाणाऱ्या #नामचेबाजार #NamcheBazaar कडे निघालो, तेव्हा लागणारा हा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा पूल आहे.

या पुलाला ओलांडल्यानंतरच खऱ्या अर्थाने नामचे बाजारची मुख्य चढण सुरू होते.

हा पूल #दूधकोशी #DudhKoshi या वेगवान वाहणाऱ्या बर्फाळ नदीपासून सुमारे १३५ मीटर (४४३ फूट) उंचीवर टांगलेला आहे. खाली वाहणाऱ्या नदीचे रौद्र खळाखते रूप आणि प्रचंड आवाज यामुळे हा पूल ओलांडणे अत्यंत थरारक ठरतो. या पुलाची लांबी साधारणपणे ७० मीटर आहे.

येथे दोन पूल पाहायला मिळतात. जुना पूल खालच्या बाजूला आहे, तर सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्यावर नवीन व अधिक उंचीवर असणारा सध्याचा आधुनिक पूल बांधण्यात आला आहे.
बौद्ध संस्कृतीतील अत्यंत रंगीबेरंगी #लुंगता’ #prayerflags म्हणजेच #प्रार्थना ध्वजांनी आणि #खादा #बौध्द स्कार्फ ने सजवलेला असतो.

वाऱ्याच्या वेगाने हलणारे हे ध्वज संपूर्ण वातावरणात एक अध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.
हा पूल केवळ ट्रेकर्ससाठीच नाही, तर स्थानिक शेर्पा नागरिक, सामान वाहून नेणारे ‘याक’ (Yaks), खेचरे आणि पोर्टर्स यांच्यासाठी जीवनवाहिनी आहे. हिमालयातील दुर्गम भागात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी या पुलाचा वापर केला जातो.

#एव्हरेस्टबेसकॅम्प ट्रेक करणाऱ्या प्रत्येक #गिर्यारोहक आणि #र्यटकासाठी या पुलावरून चालणे आणि छबी टिपणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. पुलाच्या मध्यभागातून आजूबाजूच्या विस्तीर्ण दऱ्या आणि हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांचे विहंगम दृश्य दिसते. वेगवान वाऱ्यामुळे जेव्हा पूल हलतो, तेव्हा ट्रेकर्सच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

आम्ही सर्वांनी हा खतरनाक, जबरदस्त आणि निसर्गाचा मनस्वी आनंद-अनुभुती घेत पूल पार केला. काहीजणांनी दौड पूर्ण करण्याचा आनंद घेतला.

2783 कॕलरी जाळून 14.26 किमीचे अंतर कापून 3340 मी उंचीवर असणाऱ्या नामचे बाजारमध्ये पोहचलो.

#नामचेबाजार हे नेपाळमधील खुंबू भागात सुमारे ३,४४० मीटर (११,२८६ फूट) उंचीवर वसलेले एक अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे. नामचे हे हिमालयाचे प्रवेश द्वार समजले जाते. पूर्वी येथून खूप मोठा बाजार चालायचा. त्यामुळेच ‘नामचे’ हे गाव सोबत ‘बाजार’ लागून प्रसिध्द पावले.

या उंचीवर आणि थंड हवामानात तांबड्या चोचीचा कस्तूर (Red-billed Chough) खूप मोठ्या संख्येने दिसत होते.
नामचे आणि एव्हरेस्ट ट्रेकवरील स्थानिक शेरपा लोक या पक्ष्यांना खूप पवित्र आणि शुभ मानतात.

ते या पक्ष्यांना त्रास देत नाहीत, त्यामुळे हे पक्षी माणसांच्या खूप जवळ येतात. नामचे येथील हॉटेल्सच्या छतांवर किंवा लाकडी दांड्यांवर हे पक्षी सहज बसलेले पाहायला मिळाले.

हे पक्षी हिमालयातील अत्यंत कमी प्राणवायू असलेल्या हवेतही अगदी ५,००० ते ६,००० मीटर उंचीवरही सहज उडू शकतात. त्यांच्या पंखांची रचना त्यांना डोंगराच्या तीव्र हवेच्या प्रवाहात उत्कृष्ट नियंत्रण देते.

हिवाळ्यात जेव्हा नामचे आणि आसपासच्या परिसरात बर्फ पडतो, तेव्हा हे पक्षी आपल्या लांब लाल चोचीने बर्फ पोखरून खाली दडलेले कीटक आणि अन्न शोधून काढतात. तसेच ट्रेकर्सनी टाकलेले अन्नकण शोधण्यातही ते पटाईत असतात.