महाड: महाड तालुक्यातील कोथुर्डे धरण पूर्णपणे आटल्याने आणि वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे पाण्याचा शोध घेत मगरी आता मानवी वस्तीकडे वळू लागल्या आहेत.
मंगळवारी तालुक्यातील नांदगाव चौघुलेवाडी येथील एका गोठ्याजवळ भटकत आलेल्या साडेपाच ते सहा फूट लांबीच्या मगरीला सिस्केप (इको-एन्डेंजर्ड स्पीशीज कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन सोसायटी) संस्थेच्या बचाव पथकाने सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
गेल्या दोन आठवड्यांत परिसरात तब्बल २७ मगरी दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नांदगाव चौघुलेवाडी येथील रहिवासी अंकुश पाटील यांच्या गोठ्याजवळ मगर आढळून आल्यानंतर त्यांनी सिस्केप संस्थेशी संपर्क साधला.
माहिती मिळताच संस्थेच्या जलद प्रतिसाद पथकातील साहिल पानवकर, अक्षय भावरे, धर्मेश मेठा, परेश खाडे आणि योगेश गुरव यांनी आवश्यक बचाव साहित्य आणि वैज्ञानिक साधनांसह घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक ग्रामस्थ अंकुश पाटील, लहू पाटील, परश्या जाधव, राम पाटील आणि अमोल जाधव यांच्या मदतीने या मगरीला सुरक्षितपणे पकडण्यात आले आणि मानवी वस्तीपासून दूर नदीच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य साहित्य आणि वैज्ञानिक पद्धती वापरून ही सुटका करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सदस्य चिंतन वैष्णव यांनी दिली.
गेल्या पंधरा दिवसांपासून आजूबाजूच्या गावांतील नागरिक मगरी वस्तीत शिरत असल्याच्या तक्रारी वारंवार करत असल्याचे सिस्केपचे सदस्य योगेश गुरव यांनी सांगितले.
उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे आणि नद्या तसेच धरणांचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडल्याने वन्यजीव पाणी आणि निवाऱ्यासाठी गावांकडे धाव घेत आहेत. रस्त्यावर, जंगलात, गोठ्यांजवळ आणि घरांच्या आवारातही मगरी दिसण्याच्या घटना वाढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर स्थानिक वन विभागाने जनजागृती मोहीम राबवली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे, संध्याकाळनंतर नदीकाठ टाळण्याचे आणि भटक्या मगरींना त्रास न देण्याचे आवाहन केले आहे.
या हंगामात बचावासाठी येणाऱ्या फोनमध्ये मोठी वाढ झाली असून संस्थेचे पथक २० ते ३० मिनिटांत घटनास्थळी पोहोचून मानव आणि प्राणी दोघांचीही सुरक्षा सुनिश्चित करत असल्याचे साहिल पानवकर यांनी स्पष्ट केले.
मगरी या अनुसूची-१ मधील संरक्षित प्रजाती असल्याने नागरिकांनी घाबरून त्यांच्यावर हल्ला करू नये, तर त्वरित वन विभाग किंवा संस्थेला कळवावे, असे आवाहन अक्षय भावरे यांनी केले आहे.
दरम्यान, वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाड शहरात मगर बचाव केंद्र आणि वन्यजीव वाहतुकीसाठी वाहनाची तातडीची गरज असल्याचे सिस्केपचे अध्यक्ष आणि रायगड जिल्हा वन्यजीव रक्षक प्रेमसागर मिस्त्री यांनी नमूद केले.
जखमी आणि बचाव केलेल्या मगरींना वैद्यकीय उपचारांसाठी गाडीने आणणे हे एक आव्हानात्मक काम असते. महाडचे वन परिक्षेत्र अधिकारी आशिष पाटील यांच्या अधिकृत अधिकाराखाली नोंदी ठेवण्यासाठी, तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी हे बचाव केंद्र महत्त्वपूर्ण ठरेल, अशी मागणी संस्थेकडून करण्यात आली आहे.

