दापोली : तालुक्यातील हर्णै परिसरातील पाळंदे वाडीत तब्बल एकवीस दिवसांनंतर नळाला पाणी आल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची भीषण वणवण होत आहे.

स्वातंत्र्याला इतकी वर्षे उलटूनही येथील परिस्थिती १९४७ सालासारखीच मागासलेली वाटत असून, ग्रामस्थांना मुलभूत सुविधांसाठी रोज नवा संघर्ष करावा लागत आहे.

गावात दिवसातून पाच-पाच तास वीजपुरवठा खंडित असतो आणि अनेकदा संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागते. या अंधारामुळे आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक वेदना सहन कराव्या लागत आहेत.

याशिवाय गावातील रस्त्यांची अवस्था इतकी भयानक आहे की, त्यावरून चालताना एखाद्या कोरड्या नदीच्या पात्रातून चालत असल्याचा भास होतो.

या सर्व गैरसोयींचा थेट फटका ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर आणि येथील अर्थकारणावर होत आहे.

पाणी, वीज आणि रस्त्यांच्या या दुरवस्थेचा सर्वात मोठा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसत आहे. वीज नसल्यामुळे हॉटेलमध्ये मुक्कामाला आलेले पर्यटक प्रचंड त्रस्त होतात.

अनेक पर्यटक हॉटेलचे बुकिंग रद्द करतात किंवा गैरसोयीमुळे झालेले बिल निम्म्यावरच देऊन निघून जातात. त्यातच ज्या वेळी पर्यटकांची वाहने गावात येतात, तेव्हा रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे रोज तीन-तीन तास भीषण वाहतूक कोंडी होते.

या सर्व त्रासाला आणि गैरसोयींना कंटाळून पर्यटक हर्णैमध्ये थांबण्याऐवजी इतर गावांचा रस्ता धरतात. परिणामी स्थानिक दुकानदार, हॉटेल व्यावसायिक आणि मच्छीमार यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

या समस्या सहज सोडवता येण्यासारख्या आहेत, मात्र केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हर्णै गावाचा विकास खुंटला आहे.

प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे सामान्य ग्रामस्थांच्या वाट्याला केवळ आर्थिक नुकसान, हालअपेष्टा आणि वेदनाच उरल्या आहेत.