रत्नागिरी: कोल्हापूरच्या ‘करवीर हायकर्स’च्या सात सदस्यांनी अत्यंत प्रतिकूल हवामानाचा आणि खडतर मार्गाचा सामना करत समुद्रसपाटीपासून ५३६४ मीटर उंचीवर असलेली ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ मोहीम नुकतीच यशस्वीपणे पूर्ण केली.

यामध्ये रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, सुप्रिया सातपुते, मुरुमचे उद्योजक आप्पासाहेब मुंडासे, कोल्हापूरचे उद्योजक विशाल मेहता आणि समाजमाध्यम प्रभावक नुपूर व अक्षय मठकर यांचा समावेश होता.

वयाच्या २१ व्या वर्षी एव्हरेस्ट आणि जगातील सर्वात धोकादायक ‘अन्नपूर्णा’ पर्वत सर करणारी युवा गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली.

या मोहिमेसाठी हे पथक १५ मे रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे दाखल झाले होते. काठमांडू येथून जगातील सर्वात धोकादायक मानल्या जाणाऱ्या लुकला विमानतळापर्यंतचा प्रवास केल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष ट्रेकिंगला सुरुवात झाली.

लुकला, फाकडींग, नामचे बाजार, तेंगबोचे, दिंगबोचे, लोबुचे, गोरकक्षेप आणि अखेरीस एव्हरेस्ट बेस कॅम्प असा हा टप्प्याटप्प्याचा प्रवास होता.

२३ मे रोजी बेस कॅम्पवर भारताचा राष्ट्रध्वज फडकवून आणि संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करून या मोहिमेची यशस्वी सांगता करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान रात्रीचे तापमान उणे १५ अंश सेल्सिअस, तर दिवसाचे तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअस इतके खाली जात होते. विशेषतः लोबुचे ते बेस कॅम्प हा प्रवास अत्यंत खडतर आणि जीवघेणा होता.

हाडे गोठवणारे थंड वारे आणि अत्यंत दुर्गम रस्ता यामुळे पथकाच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची मोठी कसोटी लागली, मात्र या सर्व आव्हानांवर त्यांनी यशस्वीपणे मात केली.

नेपाळमधील ‘पीक १५ अडव्हेंचर’चे शेखर तमांग, योगेंद्र तमांग व प्रशांत तमांग यांनी या मोहिमेत स्थानिय मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली.