दापोली : तालुक्यातील महावितरणच्या भोंगळ, अकार्यक्षम आणि बेजबाबदार कारभाराला कंटाळून आता स्थानिक व्यावसायिक तीव्र आक्रमक झाले आहेत.

वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे पर्यटन व्यावसायिक, फळ प्रक्रिया उद्योजक आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे.

या निष्काळजी प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी दापोलीतील सर्व व्यावसायिकांनी एकत्र येत महावितरण कार्यालयावर थेट धडक देण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवार, दिनांक २९ मे २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता दापोलीतील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे.

महावितरणच्या या गलथान कार्यपद्धतीमुळे स्थानिक उद्योजकांचे आणि पर्यटन व्यवसायाचे भविष्य अक्षरशः धोक्यात आले आहे. केवळ खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी या ‘महावितरण निवेदन दिनी’ सर्वांनी एकत्र येण्याची हाक देण्यात आली आहे.

ग्राहकांच्या हक्काची सर्रास पायमल्ली करणाऱ्या या यंत्रणेला आता रस्त्यावर उतरूनच उत्तर दिले जाईल, असा सज्जड इशारा या संतापलेल्या व्यावसायिकांनी प्रशासनाला दिला आहे.