मुंबई/दापोली : दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातील वाढत्या विजेच्या समस्येकडे लक्ष वेधत राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नवीन विद्युत उपकेंद्रांची मागणी केली आहे.

या भागातील सद्यस्थितीत असलेल्या विद्युत वितरण प्रणालीवर अतिरिक्त भार येत असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत.

वाढती निवासी आणि औद्योगिक विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी टाळसुरे येथे एका अति उच्चदाब उपकेंद्रासह खेड आणि दापोलीत आणखी पाच नवीन ३३/११ के. व्ही. विद्युत उपकेंद्रांना प्रशासकीय मंजुरी आणि निधी देण्याची मागणी केली आहे.

दापोली तालुक्यातील टाळसुरे येथे २२०/३३ के. व्ही. क्षमतेचे नवीन अति उच्चदाब विद्युत उपकेंद्र उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सन २०२६-२७ ते २०३५-३६ च्या एसटीयू योजनेअंतर्गत हे उपकेंद्र प्रस्तावित आहे. यासोबतच, परिसरातील वीजप्रवाह अतिभारीत होऊन निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आणखी पाच उपकेंद्रे उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

या नवीन पाच ३३/११ के. व्ही. उपकेंद्रांमध्ये दापोली तालुक्यातील वळणे एमआयडीसी आणि आसूद, तर खेड तालुक्यातील नातूनगर, फुरूस आणि शिवतर येथील प्रस्तावित विद्युत उपकेंद्रांचा समावेश आहे.

या पाच उपकेंद्रांसाठी एकूण ३६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी आणि त्यांना तातडीने प्रशासकीय मंजुरी द्यावी, अशी विनंती योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

या उपकेंद्रांमुळे परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होऊन नागरिकांसह उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे.