नवी मुंबई : खारघर परिसरात भरदिवसा एका कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख २० हजार रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दापोलीतील काँग्रेसचे पुढारी आणि सामाजिक कार्यकर्ते मकबूल दिनवारे यांच्या गाडीतून ही चोरी झाली आहे. मकबूल दिनवारे हे मूळचे दापोलीचे असले तरी सध्या ते कुटुंबासह तळोजा फेज १ मधील अमर हर्मोनी येथे वास्तव्यास आहेत.

याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ मे २०२६ रोजी दुपारी १२.१० वाजताच्या सुमारास मकबूल दिनवारे हे त्यांच्या मुलीच्या एव्हिएशन कोर्सची फी भरल्याची पावती घेण्यासाठी खारघरच्या सेक्टर १३ मधील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल आणि एव्हिएशन येथे गेले होते.

त्यांनी त्यांची हुंडाई व्हेन्यू कार (MH 08 BE 3171) शाळेच्या गेटसमोर रस्त्याच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये उभी केली होती.

शाळेतील काम आटोपून साधारण अर्ध्या तासाने, म्हणजेच दुपारी १२.४५ च्या सुमारास ते आणि त्यांचा मुलगा मोहम्मद तारीक हे दोघे गाडीजवळ परतले.

त्यावेळी गाडीच्या ड्रायव्हर सीटच्या मागील उजव्या बाजूच्या दरवाजाची काच फुटलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

गाडीची आतून पाहणी केली असता, गाडीत ठेवलेली पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची पिशवी गायब असल्याचे त्यांना आढळले.

या पिशवीमध्ये १ लाख २० हजार रुपयांची मोठी रोख रक्कम, त्यांच्या फ्लॅटची महत्त्वाची कागदपत्रे, मुलगा मोहम्मद तारीक याचे चेकबुक आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्याचे सही केलेले कोरे चेकबुक असा अत्यंत महत्त्वाचा ऐवज ठेवलेला होता.

अज्ञात चोरट्याने भररस्त्यात आणि वर्दळीच्या ठिकाणी गाडीची काच फोडून हा सर्व मुद्देमाल लंपास केला आहे. दापोलीतील एका ओळखीच्या राजकीय आणि सामाजिक व्यक्तीच्या बाबतीत हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या घटनेमुळे खारघर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.