देवरुख पोलिसांकडून दरोड्याचे आरोपी जेरबंद

Devrukh : रत्नागिरी जिल्ह्यातील आंबाघाट परिसरात एका टेम्पो चालकाला अडवून, चाकूचा धाक दाखवून मारहाण करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या टोळीचा देवरुख पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ५ आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून अन्य ३ जणांचा शोध सुरू आहे.

घटनेचा तपशील:
८ एप्रिल २०२६ रोजी प्रथमेश तानाजी दळवी (रा. शाहूवाडी) हे आपल्या बोलेरो गाडीतून म्हैस घेऊन रत्नागिरीहून सांगलीकडे जात होते. सायंकाळी ६:३० च्या सुमारास आंबाघाट-दख्खन येथे ‘पांडुरंग’ लिहिलेली थार आणि ‘भारत सरकार’ स्टिकर असलेली इनोव्हा अशा दोन गाड्यांनी त्यांना अडवले. ८ अनोळखी व्यक्तींनी दळवी यांना मारहाण करत चाकूचा धाक दाखवला. त्यांना जबरदस्तीने गाडीत कोंडून साखरपा येथील पेट्रोल पंपावर नेण्यात आले. तिथे ५०,००० रुपयांची मागणी करून, केबिनमधील २५,००० रुपये हिसकावून घेतले आणि पोलिसात गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलीस कारवाई:
दळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. नं. ४७/२०२६) दाखल झाला. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय झावरे व त्यांच्या पथकाने वेगाने चक्र फिरवून पाच आरोपींना अटक केली.

अटक केलेले आरोपी:
१) फरहान रशिद मुल्ला (४२, रत्नागिरी)
२) प्रथमेश सचिन भाटकर (२४, गोळप)
३) सर्वेश सुभाष किर (२२, सोमेश्वर)
४) धर्मलिंगम विजयकुमार नाडर (२६, कुवारबांव)
५) भूषण विपेंद्र सावंत (२६, मिऱ्या)

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, शांताराम पंदेरे, प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, नितीन जाधव, प्रशांत साळुंखे, अमर सुतार आणि रेश्मा चव्हाण यांनी सहभाग घेतला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*