गॅस टंचाईमुळे रत्नागिरीतील हॉटेल व्यवसाय संकटात; प्रशासनाविरोधात व्यावसायिकांचा एल्गार

रत्नागिरी : गेल्या १५ दिवसांपासून रत्नागिरी शहर आणि परिसरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यावसायिक तीव्र अडचणीत आले आहेत.

गॅसअभावी अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असून हॉटेल मालक, कामगार आणि पर्यटकांचे हाल होत आहेत.

या पार्श्वभूमीवर ‘हॉटेल लँडमार्क’ येथे आयोजित सभेत व्यावसायिकांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.

हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी यांची भेट घेऊन या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती.

पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार ८० गरजू व्यावसायिकांची यादी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती.

मात्र, केवळ २५ ते ३० जणांनाच सिलिंडर मिळाले असून ५० हून अधिक व्यावसायिक अजूनही प्रतीक्षेत आहेत.

वितरण व्यवस्थेतील या गोंधळामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे.

गॅस एजन्सी स्थानिक व्यावसायिकांना सहकार्य करत नसल्याचा आरोप या सभेत करण्यात आला.

गॅस मिळत नसल्याने अनेकांनी महागड्या डिझेल शेगड्या खरेदी केल्या, मात्र पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने व्यावसायिकांची कोंडी झाली आहे.

आंबा आणि पर्यटन हंगाम तोंडावर असताना पर्यटकांना सेवा कशी द्यायची, असा प्रश्न उपस्थित झाला असून प्रत्येक व्यावसायिकाला आठवड्याला किमान ३ सिलिंडर मिळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना पुन्हा एकदा निवेदन देण्यात येणार आहे.

या सभेला हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, उपाध्यक्ष उदय लोध, सचिव सुनील देसाई यांच्यासह १०० हून अधिक हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

शहरात रोज २०० हून अधिक सिलिंडरची गरज असताना, दिवसाला केवळ एक सिलिंडर देऊन व्यवसाय कसा करायचा, अशी व्यथा व्यावसायिकांनी मांडली असून शासनाने त्वरित मदत न केल्यास हॉटेल व्यवसाय बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*