दापोलीत किरकोळ अपघातावरून आरोग्य सेविका आणि व्यावसायिकांमध्ये राडा; एकाबाजूने अटकेची तर दुसऱ्या बाजूने निलंबनाची केली मागणी

दापोली: शहरात एका दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या किरकोळ घासण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

या घटनेत एका आरोग्य सेविकेसह संबंधित व्यावसायिक पक्षावरही गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये कारवाई सुरू केली आहे.

पहिल्या तक्रारीनुसार, ६ मार्च रोजी सायंकाळी आरोग्य सेविका आणि त्यांचे पती आपल्या दुचाकीवरून जात असताना एका थार वाहनाला त्यांच्या दुचाकीचा कोपरा घासला. यावरून चर्चा करण्यासाठी हे दांपत्य संबंधित वाहन मालकाकडे गेले असता तिथे शाब्दिक चकमक झाली.

त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना, दापोली न्यायालयासमोर आरोपींनी त्यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडले आणि शिवीगाळ करत मारहाण केली.

यावेळी धारदार शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी चार जणांवर विनयभंग आणि मारहाणीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

दुसरीकडे, दुसऱ्या पक्षानेही या आरोपांचे खंडन करत प्रतिवाद केला आहे.

त्यांच्या दाव्यानुसार, संबंधित आरोग्य सेविका आपल्या कामाचे ठिकाण आणि वेळ सोडून १० किलोमीटर दूर खाजगी वादासाठी त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी आल्या होत्या.

तिथे त्यांनी शिवीगाळ करत गोंधळ घातला. जेव्हा हा पक्ष पोलीस ठाण्यात जात होता, तेव्हा आरोग्य सेविकेच्या दुचाकीने त्यांच्या गाडीला कट मारल्याने ते खाली पडले आणि त्यांना मारहाण करण्यात आली.

सरकारी गणवेशाचा आणि पदाचा गैरवापर करून सामान्य नागरिकांना धमकावल्याचा आरोप करत, या प्रकरणी आरोग्य सेविकेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित महिलेने जिल्हाधिकाऱ्यांकडे या कर्मचाऱ्याच्या निलंबनाचीही मागणी केली आहे.

सध्या पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण या दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास करत असून, दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप-प्रत्यारोप झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*