
रत्नागिरी: दिव्यांगांच्या सेवेसाठी काम करणाऱ्या रत्नागिरीतील ‘आस्था सोशल फाउंडेशन’च्या वतीने दरवर्षी ८ मार्च रोजी दिला जाणारा ‘सुपर मॉम’ पुरस्कार यंदा ज्योत्स्ना अजित कुळये यांना देण्यात आला आहे.
शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि ५ हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप असून, कुळये यांच्या निवासस्थानी जाऊन हा गौरव करण्यात आला.
८५ टक्के बहुदिव्यांग असलेल्या मुलाला जिद्दीने आणि चिकाटीने स्वावलंबी बनवण्यासाठी घेतलेल्या अपार कष्टांची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला आहे.
मूळच्या उमराड (गुहागर) येथील माहेरवाशीण आणि गोविळ (लांजा) येथील सासरवाशीण असलेल्या ज्योत्स्ना कुळये यांचा संघर्ष २००७ मध्ये मुलगा देवेशच्या जन्मानंतर सुरू झाला.
मणक्याच्या आजारामुळे देवेशच्या तब्बल १४ शस्त्रक्रिया झाल्या, मात्र तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला नाही.
अशा परिस्थितीत न डगमगता त्यांनी सासरच्या मंडळींच्या पाठिंब्यावर मुलाला सामान्य शाळेत प्रवेश मिळवून दिला.
मुलाला उचलून शाळेत नेणे, तिथे व्हीलचेअरजवळ दिवसभर थांबणे आणि पुन्हा घरी आणणे असा त्यांचा नित्यक्रम होता.
त्यांच्या या समर्पणाची दखल घेत शाळेच्या मुख्याध्यापिकांनी १० वी शिक्षण झालेल्या ज्योत्स्ना कुळये यांना बालवर्गाला शिकवण्याची संधीही दिली होती.
लॉकडाऊनच्या काळात लांजा तालुक्यातील बेणी येथे स्थलांतरित झाल्यानंतरही त्यांनी मुलाचे शिक्षण थांबू दिले नाही. न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे प्रवेश घेतलेल्या देवेशने दहावीत ७४ टक्के गुण मिळवून यश संपादन केले.
ऐकण्याचा त्रास असूनही देवेशने जिद्दीने कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला असून त्याला ‘उडान’ दिव्यांग शिष्यवृत्तीही प्राप्त झाली आहे.
देवेशने यंदा बारावीची परीक्षा दिली असून, त्याला एक यशस्वी नागरिक घडवण्यासाठी ज्योत्स्ना कुळये यांनी दिलेल्या लढ्याला आस्था फाउंडेशनने ‘सुपर मॉम’ पुरस्काराने गौरवले आहे.
याप्रसंगी सासू मंदाकिनी कुळये, संस्थेच्या सचिव सुरेखा पाथरे, संकेत चाळके, हसना नेवरेकर आणि आल्हाद पाथरे उपस्थित होते.

Leave a Reply