
दापोलीत श्री सिद्धी ईच्छापूर्ती गणेश मंडळाचा रौप्यमहोत्सवी माघी गणेशोत्सव उत्साहात; आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रमांची रेलचेल
दापोली (प्रतिनिधी): जालगाव महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील श्री सिद्धी ईच्छापूर्ती गणेश मंदिर हे सर्व भक्तांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात दरवर्षी माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने विविध धार्मिक, सांस्कृतिक, क्रिडा, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाची सुरुवात सामाजिक बांधिलकीच्या कार्यक्रमाने झाली. बुधवार, २१ जानेवारी रोजी सकाळी मोफत रक्तदान शिबिर, रक्त तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी आदी आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली. यानंतर संध्याकाळी ४ ते ६ वाजता मंडळातील मुली, मुले आणि महिलांसाठी फनी गेम्स आयोजित करण्यात आले. सायंकाळी ६ ते ८ वाजता गुहागर-धोपावे येथील कालिका माता महिला प्रासादिक भजन मंडळाच्या भजनांचा कार्यक्रम झाला. रात्री ९ ते १० वाजता कोंडविलकर बंधू आणि मंडळी यांच्या ‘सप्तरंगी फोक वाणी’ अंतर्गत ‘सन्मान मातीचा, सन्मान मराठीचा’ हा गायन कार्यक्रम रसिकांनी उपस्थित राहून अनुभवला.
मुख्य दिवस गुरुवार, २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६ ते ७.३० वाजता श्री गणेश महाअभिषेक, ७.३० ते ८.३० वाजता श्री गणेश आवर्तन पार पडला. सकाळी १० ते दुपारी १२ वाजता गिम्हवणे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अवधूत जोशी बुवा यांचे श्री गणेश जन्मकाळाचे कीर्तन झाले. दुपारी १२ वाजता श्री गणेश जन्मकाळ/प्राणप्रतिष्ठा, १२.३० ते १ वाजता महाआरती, १ ते ३ वाजता महाप्रसाद (भंडारा) वाटप करण्यात आले.
दुपारी ३ ते रात्री ८ वाजता हळदीकुंकू, सायंकाळी ५.३० ते ८.३० वाजता रश्मी जाईल प्रस्तुत परंपरा ग्रुप दादर मुंबई यांचे मंगळागौरीचे पारंपरिक खेळांचे सादरीकरण होणार आहे. तसेच सायंकाळी ३.३० ते ५.३० आणि ७ ते ८.३० वाजता श्री हरीपाठ मंडळ गिम्हवणे यांचा हरिपाठ आणि दिंडीचा कार्यक्रम आयोजित आहे.
श्री सिद्धी ईच्छापूर्ती गणेश मंडळ महालक्ष्मी रोड, दापोली यांच्या वतीने आयोजित या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.

Leave a Reply