रत्नागिरी : पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पोलीस मुख्यालयाजवळच पोलीसांसाठी 50 खाटांचे कोव्हिड सेंटर तयार केलं आहे. आजपासूनच इथं पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

रत्नागिरीमध्ये पोलीसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. बंदोबस्तासाठी पोलीस दलाला मनुष्यबळाची गरज आहे. या कोरोनाच्या संकटात पोलीसांवर तातडीनं उपचार होणंही गरजेचं आहे. त्यामुळे पोलीसांवर चांगले उपचार होऊन पुन्हा ते मैदानात यावेत यासाठीच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी ही संकल्पना पुढे आणली.

आतापर्यंत जिल्ह्यात 54 पोलीस कर्मचारी आणि काही अधिकारी, कुंटुबीय कोविड बाधित झाले आहेत. एकट्या शहर पोलीस स्टेशनमधील 11 पोलीस बाधित झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखताना हे पोलीस कर्मचारी नागरिकांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचारी ही बाधित होत असून यंत्रणेवर ताण पडत आहे.

हा ताण कमी करण्यासाठी पोलीस मुख्यालयातील इमारतीमध्ये पोलीस व त्यांच्या कुटुंबासाठी 50 खाटांचे कोविड सेंटर उभे केल आहे. प्रवीण मुढे स्वतः डॉक्टर आहेत. त्यांनाही कोविड झाला होता. अशा वेळी काय करावं व काय करू नये, यांची पूर्ण कल्पना त्यांना आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा कर्मचाऱ्यांना व्हावा, कोरोनाला हरवून कर्मचारी पुन्हा या युद्धात सामिल व्हावेत, यासाठी हे सेंटर सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर दिवसातून दोन वेळा इथे भेट देऊन येथील रुग्णांना तपासणार आहेत. अगदीच गरज असेल तर त्यांना शासकीय रुग्णालयातही दाखल करण्यात येईल. या निर्कणयामुळं कर्मचाऱ्यांना मानसिकदृष्ट्या दिलासा मिळला आहे.