स्वॅब अहवाल आल्यावर चित्र होईल स्पष्ट – जालगाव ग्रामपंचायत
दापोली- तालुक्यातील जालगाव बाजारपेठेतील करमरकर दवाखाना बंद करण्याचे फर्मान ग्रामपंचायतीनं सोडले आहेत. एका पॉझिटिव्ह पेशंटला प्रसाद करमरकर डॉक्टरांनी तपासल्याचं कारण देत संपूर्ण दवाखाना १४ दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश ग्रामपंचायतीनं दिले आहेत. पण या संदर्भात कोणतेही लेखी आदेश देण्यात आलेले नाहीये, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव जरी वाढत असला तरी इतर आजारांवर उपचार करण्यासाठी दवाखाने सुरू असणं आवश्यक आहे. दवाखान्यात एखादा पॉझिटिव्ह रूग्ण येऊन गेल्यावर जर दवाखाने बंद करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात येत असतील तर सर्व खाजगी दवाखाने बंद होतील. कोरोना नसलेल्या रूग्णांनी अशा वेळी काय करायचं? कुठे उपचार घ्यायचे? असे प्रश्न विचारले जात आहेत.
डॉक्टर प्रसाद करमरकर हे कोरोना काळातही रूग्णांची सेवा करत होते. कोरोना दरम्यान सर्दी, ताप, खोकला संपलेले नाहीयेत हे प्रशासनानं समजून घेतलं पाहिजे. डायबेटीस, बीपी, थायरॉईड सारखे आजारही आहेतच. अशावेळी सर्व दवाखाने बंद झाल्यावर त्यांनी कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घ्यावेत का?
डॉ. प्रसाद करमरकर यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीयेत. असं असताना त्यांना १४ दिवसांसाठी दवाखाना बंद करायला लावणं म्हणजे इतर रूग्णांवर अन्याय आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे होमिपॅथिओची प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्सही संतापले आहेत.
या विषयावर स्थानिक प्रशासनानं धोरणत्मक निर्णय घेणं आवश्यक आहे. सरकारी नियम काय आहेत? दवाखाना बंद करण्यात यावा का? किती दिवस बंद करावा? याबाबत अभ्यास करून निर्णय घेणं आवश्यक आहे. या संदर्भातले सर्व विषय लेखी स्वरूपात असणं बंधनकारक आहे. स्थानिक रूग्णांचे हाल होऊ नयेत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
डॉक्टर आधीच जीवावर उदार होऊन काम करत आहेत. सर्वात जास्त कोरोनाचा धोका त्यांनाच आहे. तरी देखील ते रूग्ण सेवा देत आहेत. ते दवाखाना बंद करून आरामात घरी बसू शकतात. पण मग रूग्णांचं काय? त्यांनी उपचार कोणाकडे घ्यायचे? असे अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. प्रशासनानं याबाबत व्यवस्थित विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे.
जलगाव ग्रामपंचायतीनं आपली बाजू या विषयावर स्पष्ट केली आहे. ग्रामपंचायतीचे उपसरपंच विकास लिंगावळे यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात,
स्वॅब अहवाल येईपर्यंत डॉक्टरांना क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आलं आहे. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला तर ते लगेच प्रॅक्टिस करू शकतात. त्यांचा दवाखाना आम्ही बंद केलेला नाही. दुसरे डॉक्टर उपलब्ध होत असतील तर त्यांनी तो सुरू करावा. डॉक्टर पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांंचा स्वॅब घेतला जाणार आहे. स्वॅबचा अहवाल आल्यावर चित्र स्पष्ट होईल.