रत्नागिरी : उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट दिली. यावेळी त्यांनी बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष कौतुक केले.

“रत्नागिरी जिल्हा बँक ही 30% लाभांश देणारी देशातील पहिली बँक आहे,” असे गौरवोद्गार काढत अजित पवार यांनी बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

बँकेची आर्थिक स्थिती उत्तम असून, राज्यातील पहिल्या पाच बँकांमध्ये बँकेचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार यांनी आपल्या भाषणात पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आणि गोविंदरावजी निकम यांच्यासोबतच्या राज्य सहकारी बँकेतील कामाचा अनुभव सांगितला.

योग्य नेतृत्व आणि संचालक मंडळाच्या सहकार्यामुळेच रत्नागिरी जिल्हा बँक आज प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी नमूद केले.

“तानाजीराव चोरगे यांच्यासारख्या अभ्यासू आणि तत्त्वनिष्ठ नेतृत्वामुळेच बँकेने 800 कोटींवरून 5000 कोटींच्या व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल केली आहे,” असे अजित पवार म्हणाले.

बँकेचा सलग 12 वर्षे 0% नक्त एनपीए आणि 14 वर्षे ‘अ’ ऑडिट वर्ग याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी अजित पवार यांनी शासनाच्या ठेवी बँकेत वळवण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम आणि जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याचे आवाहन केले.

सहकार चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी तानाजीराव चोरगे यांच्या अनुभवाचा शासनाला उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.

बँकेच्या प्रगतीत संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांना अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

खाकार्यक्रमाची सुरुवात बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या प्रस्ताविक भाषणाने झाली, तर अध्यक्षांच्या भाषणाने समारोप झाला.