रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
ऐतिहासिक व्यक्ती, थोर पुरुष, उच्च पदावरील व्यक्ती किंवा समाजातील कोणत्याही व्यक्तीबद्दल भावना दुखावतील, अशी पोस्ट किंवा स्टेटस ठेवल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरीमार्फत सोशल मीडियावर २४ तास लक्ष ठेवण्यात येत आहे.
फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप किंवा युट्युब यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तींचे रेकॉर्ड तयार करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
तसेच कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा किंवा व्हिडीओ पसरवल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
“सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास तरुणवर्ग व इतरांचे भवितव्य अडचणीत येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणे टाळावे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड करू नये,” असे आवाहन पोलीस अधीक्षक धनाजी कुलकर्णी यांनी केले आहे.
समाजातील प्रतिष्ठितांनी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर पसरू नये म्हणून योग्य प्रयत्न करून जागृती करावी.
तसेच रत्नागिरी जिल्ह्यात जातीय सलोखा राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
सोशल मीडियावर प्रसारित केल्या जाणाऱ्या पोस्ट व वृत्तपत्रांमधील बातम्या प्रसारित करण्यापूर्वी त्या विभागाकडून खात्री करावी, असेही पोलिसांनी सांगितले आहे.