हर्णे (वार्ताहर) : नॅशनल हायस्कूल हर्णे येथे आनंददायी शनिवार व FLN निपुण महाराष्ट्र अंतर्गत माता पालक गटाच्या सहभागातून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी बुशरा बाणकोटकर यांच्या कुरआन पठणाने झाली. त्यानंतर विद्यार्थिनींनी समूह नआत गायन सादर केले.
शाळेचे मुख्याध्यापक आसिफ भाटकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले. प्रमुख पाहुण्या म्हणून हर्णे ग्रामपंचायत सदस्या व सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सना मुजम्मील काझी उपस्थित होत्या.

ज्येष्ठ शिक्षक मुबीन बामणे यांनी प्रास्ताविक करताना महिला दिनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, सानिया मिर्झा यांच्या वेशभूषा करून प्रभावी भाषणे दिली.
ह्युज ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका नदाफ यांनी महिलांच्या आदराचे महत्त्व सांगितले. शिक्षिका ऐनरकर यांनी महिलांचा दररोज आदर करण्याची गरज व्यक्त केली.

प्रमुख पाहुण्या सना काझी यांनी शिक्षणामुळे महिला काय करू शकतात, याबद्दल आपले विचार मांडले. मुख्याध्यापक भाटकर यांनी स्त्रीच्या कार्याचे महत्त्व सांगितले.

मुबीन बामणे यांनी आभार मानले. विद्यार्थिनी आयेशा काजी व जोया बाणकोटकर यांनी सूत्रसंचालन केले.