दापोली : विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घर’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत साखळोली गावात शनिवारी (दि. २२) लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळा क्र. १ च्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात सरपंच दीक्षा तांबे व उपसरपंच दिनेश तांबे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पत्रके प्रदान करण्यात आली.
यावेळी बाणेवाडी (पुणे) येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे व १० लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण साखळोलीतील लाभार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. ग्रामअधिकारी अविनाश माळशिकारे यांनी ऑनलाइन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
या सोहळ्याला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैभवी गोरीवले, सदस्य रामकृष्ण बर्वे, मनोज जाधव, विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष वसंत शिंदे, ग्रामस्थ संदीप नवरत, महेश तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सरपंच दीक्षा तांबे यांनी शासनाचे व उपस्थितांचे आभार मानले. गावातील सर्व लाभार्थ्यांनी दिवाळीपर्यंत नव्या घरात प्रवेश करावा, अशी सदिच्छा व्यक्त केली.
या योजनेमुळे गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळणार असून, साखळोलीच्या विकासात या योजनेचा मोठा वाटा असणार आहे, असे उपस्थितांनी सांगितले.