दापोली : तालुक्यातील निसर्गरम्य शिरसोली गावात, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी, स्वयंभू शंभू महादेवांच्या मंदिराच्या प्रांगणात भव्य महाशिवरात्र उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. १९७४ मध्ये येथे तीन वर्षे गंगामाता अवतरल्याच्या घटनांमुळे या स्थानाला विशेष पावित्र्य लाभले आहे.

महाराष्ट्र शासनाने २००४ मध्ये या स्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.

या उत्सवाची सुरुवात २२ फेब्रुवारीपासून मुंबई ते शिरसोली पायी दिंडी सोहळ्याने होईल.

२६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता दिंडीचे गावात आगमन होईल.

त्यानंतर ग्रामदैवत भैरी भवानीच्या मंदिरातून वारी निघून शिवशंभूच्या मंदिरात पोहोचेल.

हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जाईल.

दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. सकाळी महादेवांच्या मूर्तीवर मंत्रोच्चारात अभिषेक होईल.

त्यानंतर गोसावी देवांचे पूजन आणि दुपारी महाआरती होईल. रात्रौ ८ वाजल्यापासून वारकरी संप्रदायाच्या नामांकित दिंड्या हरिनामाचा जागर करतील.

कोकणातील खास वाद्य खालु बाजाने दिंड्यांचे स्वागत होईल. २७ फेब्रुवारी रोजी पहाटे काकड आरती आणि त्यानंतर महाप्रसादाने या भव्य उत्सवाची सांगता होईल.

या उत्सवात स्थानिक बाजारपेठही भरेल. दापोली तालुक्यातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या तालुक्यांतील हजारो भाविक या उत्सवाला उपस्थित राहतात.

हा उत्सव शिस्तबद्ध आणि नियोजित पद्धतीने साजरा होतो.