दापोली : तालुक्यातील जालगांव येथील जलस्वराज्य ग्रामपंचायतीच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पंचाहत्तर बहुमजली इमारतीमधील सुका कचरा थेट पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठविण्यात येतोच.

पण आता स्वच्छता अभियानामध्ये एक पाऊल पुढे टाकत घरातील रूग्णांचा जैववैद्यकीय कचराही  शास्त्रोक्त विघटनासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात प्रथमच अशा सूक्ष्म पद्धतीने कचरा विघटनाचे काम जालगावमध्ये सुरू झाले आहे.
     जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव तालुका दापोली तर्फे माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जे  मधुमेहाचे रुग्ण घरच्या घरी साखर तपासतात किंवा इन्शुलिन घेतात अशा रुग्णांना जैव वैद्यकीय कचरा संकलनाकरिता ग्रामपंचायत जालगावच्या माध्यमातून बरण्यांचे वाटप करण्यात आले.

या संकलित जैव वैद्यकीय कचऱ्याचे विघटन जालगाव आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून संकलित करून शास्त्रीय दृष्ट्या पद्धतीने करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील या पहिल्या उपक्रमाचे जालगाव ग्रामस्थानी  तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.आठल्ये यांनी स्वागत केले आहे .

या प्रकल्पाचा शुभारंभ अभियान कालावधीमध्ये १३ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आला.

याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच अक्षय फाटक, माझी वसुंधरा अभियानाचे अध्यक्ष प्रशांत परांजपे, समिती सदस्य शिरीष देसाई, ग्रामपंचायत सदस्य शोभा दांडेकर,  त्याचप्रमाणे जालगाव आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी अश्विनी सिरसवाल  अस्मिता धाडवे, अंकिता भांबिड, सुप्रिया गुंदेकर, स्मिता सकपाळ, रसिका राऊत, आरोग्य सेविका पल्लवी आंबेडे, ग्रामपंचायत जालगांवचे  तांत्रिक सहाय्यक जितेंद्र पालकर आणि वेदांत शितूत तसेच पर्यावरण दूत उत्तम आघारकर  उपस्थित होते.