जेसीआयचा दशकपूर्ती पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
दापोली : आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक, प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन, आणि व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांसाठीच्या ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल दापोली शाखेचा दशकपूर्ती पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी दहाव्या अध्यक्षपदाची शपथ जेसी फराज रखांगे यांनी ग्रहण केली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ जयवंत जालगांवकर, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक तर विशेष अतिथी म्हणून माजी विभागीय अध्यक्ष जेएफडी अतुल गोंदकर उपस्थित होते.

मावळते अध्यक्ष जेसी रित्विक बापट यांनी गतवर्षीच्या उपक्रमांचा आढावा घेत वार्षिक अहवाल सादर केला. तसेच उत्तम कामगिरी करणाऱ्या जेसी सदस्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

जेसी फराज रखांगे यांनी येत्या वर्षभरामध्ये समाजातील गरजू व्यक्तींसाठी विशेष काम करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्याचबरोबर शाश्वत विकास नजरेसमोर ठेवून कार्य करणार असल्यासही त्यांनी सांगितलं.

कार्यक्रमास जेसी सदस्य तसेच इतर संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेसी तेजस मेहता यांनी केले.
