दापोली : दापोली उपजिल्हा रुग्णालयातील 50 खाटांच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी देण्यात आलेल्या मुदतीमध्ये अतिशय कमी काम झाल्यानं राज्यमंत्री नामदार योगेश कदम चांगलेच संतापले. अधिकाऱ्यांना धारेवर धरत तुम्हाला काम जमत नसतील तर घरी जा, मी हे खपून घेणार नाही, या शब्दात त्यांनी सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

सध्याच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूला सुरु असणाऱ्या नव्या इमारतीच्या बांधकामाबाबत आवर्जून उल्लेख करुन राज्यमंत्री कदम म्हणाले, 50 खाटांच्या रुग्णालयाची इमारत वर्षभरात उभी राहत नसेल, तर ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी नामुष्कीची बाब आहे.

अधिकाऱ्यांनी गतिने उभ्या राहिलेल्या अन्य इमारतींच्या बांधकामाचा आदर्श घेवून गतीने काम करावे. वेळेत काम पूर्ण करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी फोनवर केली चर्चा

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी नामदार योगेश कदम यांनी फोनवरून उपजिल्हा रुग्णालयातील या नवीन बांधकामाबाबत चर्चा केली. स्ट्रक्चरल डिझायनिंग सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तातडीने दिली जात नसल्यामुळे विकास कामांवर परिणाम होत आहे, असं त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना सांगितलं.

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्याची त्यांनी शिवेंद्रराजेंना विनंती केली. त्याचबरोबर मुंबईत आल्यावर आपली भेट घेईल असं सांगितलं.
आम्ही निधी जनतेसाठी आणतो
विकासकामांसाठी निधी आणताना आम्हाला किती कष्ट घ्यावे लागतात, याची जाणीव तुम्हाला नसल्यामुळेच अशा महत्त्वाच्या कामांमध्ये हलगर्जीपणा होत आहे असं ना. योगेश कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनाववलं. आता वर्षभरामध्ये काम पूर्ण झालं नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर पैसे वाढवून मागेल तेव्हा जनतेचाच पैसा वाया जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. शिवाय आम्ही तुमच्यासाठी निधी आणत नाही तर जनतेसाठी आणतो हेही सांगायला, नामदार योगेश कदम विसरले नाहीत.