दिव्यांगांच्या रोजगार निर्मितीसाठी मी प्रयत्नशील – मंत्री योगेश कदम
रत्नागिरी – दिव्यांगांना जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारायला लागू नयेत, शासन योजनेपासून वंचित रहायला लागू नये, यासाठी तालुक्याच्या ठिकाणी शिबीर घेवून जागच्याजागी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत.

त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ते पात्र ठरले आहेत. आमदार निधी, जिल्हा परिषद सेस निधी, जिल्हा नियोजन समितीमधील निधी असा विविध निधी एकत्रित करुन दिव्यांगांना रोजगार देण्यासाठी, उद्योग सुरु करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन ग्राम विकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

पंचायत समिती दापोली, दापोली उपजिल्हा रुग्णालयात राज्यमंत्री कदम यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या तपासणी शिबीराचे उद्घाटन झाले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, तहसिलदार अर्चना बोंबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन सावंत, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, माजी प सभापती चारुलता कामते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधीर काळे, नगरसेविका कृपा घाग, कृती शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारी आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री कदम म्हणाले, 200 किलोमीटर प्रवास करुन रत्नागिरी येथे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जाणे हे शक्य होत नव्हते.

अनेक दिव्यांग त्यापासून वंचित राहत होते. गेल्या पाच वर्षापासून तालुक्याच्या ठिकाणी शिबीर घेत आहोत. या शिबीरातून 2 हजार 17 जणांना जागेवरच दाखले मिळाले आहेत. अशा शिबीरांमधून दिव्यांगांना न्याय देण्यात यशस्वी झालो आहे.
दापोली, खेड, मंडणगड मधील दिव्यांग योजनांसाठी पात्र होणार आहेत.
दिव्यांगांसाठी ज्या वस्तू लागणार असतील त्या त्यांना सीएसआर निधीमधून मिळवून दिल्या जातील.
प्रमाणपत्राप्रमाणेच शस्त्रक्रिया करण्यासाठीही शिबीरांचे आयोजन केले जाईल.
उपजिल्हा रुग्णालयामधील उणिवा दूर करण्यासाठी विशेषत: मनुष्यबळ, डॉक्टर्स उपलब्ध होतील यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडे माझा पाठपुरावा सुरु आहे, असेही ते म्हणाले.