दापोली : शहरातील फॅमिलीमाळ येथे उमेश कुदाळकर व इतर सहहिस्सेदार यांचे नावे असलेल्या मिळकतीमध्ये दिलेल्या परवानगीपेक्षा जादा माती उत्खनन केल्याप्रकरणी तहसिलदारांनी संबधितांना दंड ठोठावला आहे.
याबाबत तहसिलदार कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुदाळकर व अन्य सहहिस्सेदारांना शंभर ब्रास माती उत्खनन करण्यासाठी महसूल विभागाकडून परवानगी देण्यात आली होती.
मंडल अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता त्यांना ३०२ ब्रास माती उत्खनन केल्याचे निदर्शनात आले. ३०२ ब्रास मातीचे उत्खननापोटी होणारी स्वामीत्वधनाची व इतर शुल्काची रक्कम ३० दिवसांच्या आत शासन दरबारी जमा करावी असे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.
अन्यथा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८७ दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी नोटीसही कुदाळकर व अन्य सहहिस्सेदारांना बजावण्यात आली आहे.