पलवणीत सहा गुरांवर हल्ला; दोन वासरांचा मृत्यू
मंडणगड : पालवणी धनगरवाडी येथे ३१ जानेवारी रोजी ग्रामस्थ विठ्ठल हिरवे यांच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याने सहा गुरांवर हल्ला केला.
यामध्ये दोन वासरांचा मृत्यू झाला, तर दोन वासरे गंभीर जखमी झाली. याचबरोबर दोन मोठ्या गायींनाही बिबट्याने जखमी केले. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे गरीब शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
वाडीपासून काही अंतरावर हा वाडा आहे. या वाड्यामध्ये दावणीला गुरे बांधलेली होती. वाड्याचे एका कोपऱ्यामधून हा बिबट्या आत शिरला.
बिबट्याने दावणीला बांधलेल्या गुरांवर हल्ला केल्याने दोन वासरे गंभीर जखमी झाली आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
दोन गायींवर बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. पालवणी धनगरवाडी परिसरात मागील अनेक दिवस बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे.
बिबट्याचा लवकरच वनविभागाने बंदोबस्त करून पालवणी पंचक्रोशीतील नागरिकांना भयमुक्त करावे, अशी या विभागातील जनतेची मागणी आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनेची तत्काळ दखल घेत वनविभागाने तत्परतेने घटनास्थळी जाऊन रितसर पंचनामे करून योग्य ती भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन ग्रामस्थ विठ्ठल हिरवे यांना दिले आहे.