दापोली- कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोलीची मासिक सभा नुकतीच दापोली येथील रामराजे महाविद्यालयात पार पडली.

कोमसाप दापोलीचे अध्यक्ष चेतन राणे यांच्या अध्यक्षतेखालील सभेसाठीच्या व्यासपीठावर बाबू घाडीगांवकर, कुणाल मंडलीक, शमशाद खान, चेतना राणे, अरविंद मांडवकर, संदीप यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीस कुणाल मंडलीक यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. सभेत कोकणचे सुपुत्र तथा ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त दापोली शाखेच्या वतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय निबंधस्पर्धा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.

याशिवाय दापोली तालुक्यातील लिहीत्या हातांसाठी नियमित खुराक मिळावा यासाठी आयोजित करावयाच्या काही साहित्य विषयक उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.

याशिवाय कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माधव अंकलगे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

सभेत कुणाल मंडलीक, शमशाद खान, बाबू घाडीगांवकर, चेतन राणे, वेदिका राणे, अरविंद मांडवकर आदींनी मते मांडली.

सभेचे सूत्रसंचालन बाबू घाडीगांवकर यांनी केले तर अरविंद मांडवकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.