रत्नागिरी – दापोलीत ३५ विदेशी संदेशवहन कबुतरे दाखल, निसर्ग चक्रीवादळाने उध्वस्त मोबाईल/इंटरनेट सेवेला पर्याय म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम. अशी आशयाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर टाइम्स ऑफ इंडिया- मुंबई आवृत्ती, १७ जुलै २०२० यांचे आभारही त्यामध्ये मानले गेलेत. कबुतरांची ही बातमी अफवाच आहे याची नोंंद जनतेेनं घ्यायची आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्या पुढाकाराने युक्रेन- रशियामधून ३५ संदेशवहन कबुतरे दापोलीत आणण्यात आली आहेत, सोबत त्यांना वापरण्यात तरबेज ३ रशियन नागरिकही आहेत असा धादांत खोटा दावा त्यामध्ये करण्यात आला आहे.
बातमी अधिक रंजक व्हावी म्हणून कबुतराच्या किमतीचाही उल्लेख त्यामध्ये करण्यात आला आहे. प्रत्येकाची किंमत ३.५ लाख रुपये असून ती सामान्य कबुतरांच्या तिप्पट वजनाची म्हणजेच साधारणपणे कोकणी घारीच्या आकाराची आहेत. यांचा रंग फिकट पांढरा असून ती अत्यंत देखणी आणि रुबाबदार आहेत. रशियामध्ये गेली २००० वर्षे या पक्षांचा संदेशवहनासाठी वापर केला जात आहे. या बातमीतील सर्व दावे खोटे आहेत, अशी माहिती दापोलीचे प्रांत शरद पवार यांनी ‘माय कोकण’शी बोलताना दिली आहे.