रत्नागिरी – अतितीव्र निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित झालेल्या ६२८ पैकी ४७२ गावांचा वीजपुरवठा गुरुवारी (१८ जून) दुपारपर्यंत सुरळीत करण्यात आला आहे. तर वीजपुरवठा बाधित झालेल्या ४ लाख १४ हजार ६९४ पैकी ८९ टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांच्या घरात वीज पोहचविण्यात महावितरण यशस्वी झाले आहे. कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य अभियंता रंजना पगारे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक व बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले अभियंते, कर्मचारी, एजन्सी व त्यांचे कामगार उर्वरित भागाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहेत. ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत, व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांचे वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात सातत्याने मार्गदर्शन मिळत आहे, अशी माहिती महावितरणनं दिली आहे.
जिल्ह्यातील दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यांसह वादळामुळे सर्वाधिक नुकसानग्रस्त इतर भागात वीज खंडित झालेल्या ४ लाख १४ हजार ६९४ पैकी ३ लाख ७० हजार ७१२ (८९.३९ टक्के) ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. बाधित सर्वच ४७ उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. १८८ फिडर पैकी १८४ फिडर पूर्ववत करण्यात आले आहेत. तर ५५०८ रोहित्रांपैकी ४९१७ रोहित्र दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आली आहेत. उच्चदाबाचे ३ हजार तर लघुदाब वाहिनीचे ५ हजार खांब जमीनदोस्त झाले होते. त्यातील उच्चदाबाचे १६२३ व लघुदाबाचे २९८३ विजेचे खांब पुन्हा उभे कारण्यात आले आहेत.
बाधित ६२८ पैकी ४७२ गावांमधील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. कोविड-१९ रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्वच सहा हॉस्पिटल, १२२१ पैकी ९९१ सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व ३२७ पैकी २८० मोबाईल टॉवर्सचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करणाऱ्या स्थानिक व कल्याण, कोल्हापूर, बारामती आदी परिमंडलातून आलेल्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच मुख्य अभियंता सौ.पगारे यांनी कठीण प्रसंगी संयम बाळगून सहकार्य करणाऱ्या वीज ग्राहकांचे आभार मानले आहेत.