चिपळूण : शहर परिसरासह बाजारपेठेत विनामास्क फिरणार्या आणि दुकानांमध्ये मास्क न वापरणार्या अशा एकूण २३६ नागरिक व व्यापार्यांवर नगर परिषदेच्या भरारी पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार सांगून न समजणाऱ्यांवर या पुढे कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही प्रशासनानं दिला आहे.
या कारवाईतून आतापर्यंत १ लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आदेशानुसार जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्या आदेशानुसार ही कारवाई न. प. प्रशासनाने सुरू ठेवली असून दंडाची रक्कम भरण्यावरून अधिकार्यांशी हुज्जत घालणार्या पाच व्यावसायिकांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याची जबाबदारी फक्त प्रशासनाची नाही तर नारिकांचीही आहे. व्यापारी सुद्धा त्यातील एक भाग आहे. दंड भरण्याची आपल्यावर वेळच येऊ नये याची खबरदारी प्रत्येकानं घेणं आवश्यक आहे. दंड झाल्यावर अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्यात काही अर्थ नाही.