रत्नागिरीत महिला दिनी प्रवाशांसाठी भेट: २२ नव्या आरामदायी एसटी बसगाड्यांचे लोकार्पण

रत्नागिरी:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी तब्बल २२ नवीन आरामदायी एस.टी. बसगाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

या बस सेवेचे लोकार्पण महिलांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. उदय सामंत प्रमुख उपस्थित होते.

या नव्या बसगाड्यांमुळे जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे.

नव्याने दाखल झालेल्या २२ गाड्यांपैकी दापोली डेपो आगारासाठी १० बस, रत्नागिरी डेपो ५ बस, लांजा डेपो ३ बस आणि राजापूर डेपोसाठी ४ बस प्राप्त झाल्या आहेत.

लोकार्पण सोहळ्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी नव्याने दाखल झालेल्या एस.टी. बसमधून प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

लांजा व राजापूर डेपो मध्ये दाखल होणाऱ्या बसचे लोकार्पण राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, “रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी ३० नवीन बसगाड्या लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यामुळे प्रवास अधिक सुलभ, गतिमान आणि सुरक्षित होईल.” या कार्यक्रमाला एस.टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, स्थानिक जनप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने एस.टी. प्रवासी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*