दापोली : तालुक्यातील भोपण येथील 6 वर्षीय नुसेबा हनीफ सहीबोले हिचा मृतदेह 14 मार्च 2021 रोजी खाडी किनारी सापडला होता. तिच्या मृत्यूच्या 100 दिवसानंतरही तपासात हवी तशी प्रगती झालेली नाहीये. त्यामुळे परिसरातून नाराजी व्यक्त होत आहे.
नुसेबा सहीबोलाचा मृतदेह सापडल्यानंतर तिच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली गेली. ती खाडी किनारी जाऊ शकत नाही असं गावातील ग्रामस्थांनी मृत्यूबाबत शंका उपस्थित केली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी भेट दिली. आता तपासात गती येईल, मृत्यूचं नेमकं कारण लवकरच जाहीर केलं जाईल असं वाटलं होतं. दुर्देवाने आजही पालकांना प्रतिक्षाच करावी लागत आहे.
तपासीक अधिकारी बदलण्यात आला
तिच्या मृत्यूच्या तपासाला गती मिळावी यासाठी पोलीस अधीक्षकांनी तपास दाभोळ पोलीस स्टेशकडून काढून दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्याकडे दिला. पण या घटनेला 100 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटून देखील पोस्टमॉर्टेम रिपोर्ट देखील सार्वजनिक करण्यात आलेला नाही. नुसेबाचे पालक पोलीस स्टेशनमध्ये खेटे मारत आहेत पण दुर्दैवाने त्यांना फक्त आश्वासन मिळत आहे.
नुसेबाबाबत नक्की काय घडलं?
ही मुलगी १२ मार्च रोजी दुपारी अडीच ते तीन च्या सुमारास भोपण मुस्लिम मोहल्ला येथे नुसेबा आणि तिचा भाऊ दय्यान सहीबोले हे दोघेही सायकल फिरवीत होते. सायकल फिरवून झाल्यानंतर दय्यान सायकल ठेवण्यास घराकडे गेला. त्यावेळी नुसेबा तेथेच उभी होती. दय्यान सायकल ठेवून पुन्हा नुसेबाला घेण्यासाठी आला असता त्याला नुसेबा कोठेही आढळली नाही, म्हणून घरातल्या पालकांसह सर्वांनी गावात सर्वत्र शोधाशोध सुरू केली. पण तिचा काही पत्ता लागला नव्हता. पोलीसही परीसरात तळ ठोकून होते. अखेर दिनांक 14 मार्च रोजी तिचा मृतदेह खाडीत किनारी सापडल्यानं परीसरात खळबळ माजली होती.
पोस्टमॉर्टेम अहवाल कधी जाहीर करणार?
नक्की या प्रकरणी काय झालं आहे? तिचा मृत्यू कशामुळे झाला आहे? याबद्दल पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेचं नक्की कारण पोस्टमार्टेम अहवालानंतर स्पष्ट होईल, असं पोलीसांनी सांगितलं आहे. आताही फार परिस्थिती बदललेली नाहीये. आजही तेच कारण पोलीसांकडून सांगितलं जात आहे. पोस्टमॉर्टेमचा अहवाल का येत नाहीये? याची उत्तरं आता पोलीसांनी देणं आवश्यक आहे.
पालकांशी पोलीस सौजन्याने वागत आहेत?
नुसेबाच्या पालकांशी नातेवाईकांशी पोलीस सौजन्याने वागत आहेत. त्यांना भेटी दिल्याजात आहेत. ही निश्चितच चांगलीबाब आहे. पण ती पुरेशी नाहीये. या मृत्यूचं नेमकं कारण पालकांना कळण्याचा हक्क आहे. यासाठी तपासाची गती वाढवणं आवश्यक आहे.
पालकांचं मौन
नुसेबाच्या पालकांशी ‘माय कोकण’च्या टीमनं बोलण्याचा प्रयत्न केला. पण ते या विषयावर थेट प्रतिक्रिया देणं टाळत आहेत. त्यांना तपास हवा आहे. त्यांना अडथळा आणायचा नाहीये. पण यंत्रणेनं त्यांच्या संयमाचा फायदा उचलणं बरोबर नाही. या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागणं गरजेचं आहे. तरच लोकांचा विश्वास अबाधित राहिल.