रत्नागिरी : हिंदी सिनेमा आणि दिलीप कुमार हे समीकरण जगाला माहीत आहे, परंतु दिलीप कुमार यांच्या मुस्लिम ओ बी सी चळवळीतील सहभागा बाबत अधिक लोकांना माहीती नाही. किंबहुना माहीती होवू नये याची काळजी घेतली गेली व जाणीवपूर्वक माहीती दाबून ठेवण्यात आली कारण ही चळवळ मुस्लिम समाजातील मागासलेल्या वर्गाची होती.

दिलीप कुमार यांनी ॲाल इंडिया मुस्लिम ओ बी सी ॲार्गनायझेशन च्या माध्यमातून ॲार्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मा. शब्बीर अन्सारी यांच्या खांद्याला खांदा लावून देशभर मुस्लिम ओ बी सी ची चळवळ प्रभावीपणे उभी करण्याकरिता मोलाचे योगदान दिले. ॲाल इंडिया मुस्लिम ओ बी सी ॲार्गनायझेशनच्या अनेक मेळावे, बैठका व कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती लाभत असे. अनेक वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदयांबरोबर बैठकांना उपस्थित राहून मुस्लिम ओ बी सी समाजाची बाजू प्रभावी पणे त्यांनी मांडली. दिलीप कुमार यांची आग्रही भुमिका व ॲाल इंडिया मुस्लिम आर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शासनाला अनेक जी आर काढावे लागले.

अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने मुस्लिम ओ बी सी समाजाची न भरून निघणारी क्षती झाली आहे अशा शब्दात ॲाल इंडिया मुस्लिम ॲार्गनायझेशन चे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांनी आदरांजली व्यक्त केली.