खेडमध्ये भावाच्या मृत्यूच्या नैराश्यातून तरुणीची आत्महत्या

खेड: शहरातील बसस्थानकाजवळील विदर्भ कोकण बँकेत कार्यरत असलेल्या सुप्रिया विनायक वनशा (वय ३२, रा. भाईंदर-ठाणे) या तरुणीने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. सुप्रियाच्या आत्महत्येमागील कारण तिच्या डायरीतील नोंदींमुळे स्पष्ट झाले असून, तीन महिन्यांपूर्वी तिच्या भावाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने ती प्रचंड तणावाखाली होती, असे तपासात उघड झाले आहे.

घटनेचा तपशील
शहरातील कुंभारआळी येथील ग. म. पाटणे संकुलातील रुम क्रमांक ३०२ मध्ये राहणाऱ्या सुप्रिया वनशा यांनी त्यांच्या फ्लॅटमधील खोलीच्या छताला असलेल्या लोखंडी हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने खेड शहरात खळबळ उडाली आहे.

डायरीतील नोंदींमुळे कारण स्पष्ट
सुप्रियाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या डायरीतून तिच्या मनातील वेदना समोर आल्या आहेत. डायरीत तिने नमूद केले की, भावाने केलेल्या आत्महत्येचे दुःख तिला सहन होत नव्हते. त्या घटनेपासून ती सतत तणावाखाली होती आणि हे दुःख असह्य झाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या डायरीमुळे पोलीस तपासादरम्यान सुरू असलेल्या अनेक तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, सुप्रियाच्या आत्महत्येमागील इतर कोणतेही कारण आहे का, याचीही चाचपणी सुरू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*