यवतमाळ : केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने तयार केलेले हेलिकॉप्टर सरावादरम्यान पंखा तुटल्याने उड्डाण भरायच्या आधीच जमीनदोस्त झाले व या अपघातातच या तरुणाचा मृत्यू झाला. शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिम असे या तरुणाचे नाव असून तो २४ वर्षांचा होता. यवतमाळमधील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे ही दुर्घटना घडली. (Yavatmal helicopter accident)
मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास यवतमाळच्या या रँचोचे आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न या अपघाताने धुळीस मिळाले व त्यातच त्याचा अंत झाल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पत्राकारागीर असलेल्या शेख इस्माईलने दोन वर्षे कठोर परिश्रम करून स्वतःचे हेलिकॉप्टर बनविले. १५ ऑगस्टला शेख इस्माईल हे हेलिकॉप्टर आकाशात उडविणार होता. त्यासाठी मंगळवारी रात्री त्याचा सराव सुरू होता. यादरम्यान हेलिकॉप्टरच्या मागील बाजूचा पंखा तुटला व तो मुख्य पंख्यावर येऊन आदळला. हा मुख्य पंखा शेख इस्माईलच्या डोक्यावर आदळला. यात तो जागीच गतप्राण झाला.