रत्नागिरीत ‘यमदूत’ रस्ते सुरक्षा जागृतीसाठी अवतरला

रत्नागिरी: रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी रत्नागिरीत वाहतूक नियमांबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आपली सुरक्षा, परिवाराची सुरक्षा’ या रस्ते सुरक्षा कार्यक्रमांतर्गत आज, ११ जून २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास जेलनाका रोडवर एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी चक्क ‘यमदूत’ रस्त्यावर अवतरला आणि त्याने वाहनचालकांना वाहतूक नियम पाळण्याचा संदेश दिला.

काळ्या पोशाखात, खांद्यावर गदा घेऊन फिरणाऱ्या या यमदूताची भव्य शरीरयष्टी पाहून लहान मुलांनाही धडकी भरली.

‘नियम पाळा, नाहीतर तुमच्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे,’ असा संदेश तो देत होता.

या उपक्रमात दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यात आले. ‘झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा’, ‘हेल्मेट घाला, जीव वाचवा’, ‘वाहन सावधपणे चालवा’, ‘फुटपाथचा वापर करा’, ‘मोबाईलवर बोलत वाहन चालवू नका’, ‘वेगमर्यादा पाळा’, ‘सीटबेल्ट लावा’, ‘मद्यपान टाळा’ अशा सूचना असलेली माहितीपत्रके वाहनचालकांना वाटण्यात आली.

यावेळी हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचा जिल्हा पोलीस अधीक्षक बगाटे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*