रत्नागिरी: मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘सॉफ्ट स्किल्स: यशाची गुरुकिल्ली’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन आणि इंनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात डॉ. रोटेरियन संदीप करे यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. संदीप करे यांनी सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले. संवाद कौशल्ये, व्यक्तिमत्व कौशल्ये आणि लोक कौशल्ये यांचा दैनंदिन जीवनात प्रभावी वापर कसा करावा आणि त्यामुळे व्यक्तिमत्व विकासाला कशी मदत होते, याबाबत त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले.

त्यांच्या या प्रेरणादायी व्याख्यानाने विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांबाबत नवीन दृष्टिकोन दिला.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य आणि रोटेरियन डॉ. केतनकुमार चौधरी यांनी सॉफ्ट स्किल्सची गरज अधोरेखित केली.
“केवळ पदवी मिळवून नोकरी मिळणे किंवा ती टिकवणे शक्य नाही. शाश्वत रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. यामुळे कामाची उत्पादकता वाढते,” असे त्यांनी सांगितले.
जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करताना युवकांनी शिक्षण घेत असताना किमान सहा सॉफ्ट स्किल्स शिकण्याचा निर्धार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी या व्याख्यानानंतर दिलेल्या अभिप्रायातून हा कार्यक्रम त्यांच्यासाठी प्रेरणादायी आणि भविष्यात उपयुक्त ठरेल, असे त्यांनी व्यक्त केले.
तसेच, आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याचा निर्धारही त्यांनी दर्शवला.
या कार्यक्रमाला रोटेरियन सीताराम सावंत, इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा, सेक्रेटरी सुवर्णा चौधरी आणि खजिनदार श्रद्धा सावंत उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राकेश जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशील कांबळे, रोहित बुरटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.