रत्नागिरी : आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे विविध कृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संयुक्त राष्ट्रांतर्फे पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
यंदाची थीम “प्लास्टिक प्रदूषण संपवू” अशी होती. सागरी प्रदूषण, लोकसंख्यावाढ, ग्लोबल वॉर्मिंग आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी १४३ हून अधिक देशांमध्ये हा दिवस साजरा होतो.

सकाळी मत्स्य जलशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव आणि सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरगाव खाडी येथे “प्लास्टिक प्रदूषण मुक्ती अभियान” राबवण्यात आले.
यावेळी खाडीतील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला आणि खारफुटीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यात आसिफ पागरकर, अनिरुद्ध अडसूळ, संदेश पाटील, भावेश सावंत, सुहास वासावे आणि मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या पेठकिल्ला येथील नवीन इमारत प्रक्षेत्रावर आशिष मोहिते यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. क्रिसमस ट्री, बदाम आणि शोभिवंत झाडांची लागवड करण्यात आली. यानंतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी पर्यावरण शपथ घेतली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, संशोधन संचालक पराग हळदणकर आणि आशिष मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.

आसिफ पागारकर, हरिष धमगये, नरेंद्र चोगले, सचिन साटम, व्ही. आर. सदावर्ते, रमेश सावर्डेकर, महेश किल्लेकर, मनिश शिंदे, जाई साळवी, सचिन पावसकर, दिनेश कुबल, सुहास कांबळे, सचिन चव्हाण, प्रवीण गायकवाड, तेजस जोशी, योगेश पिलणकर, स्वप्नील आलीम, उल्हास पेडणेकर, प्रशांत पिलणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
