मुंबई : भारतातील लस गोंधळाचा फटका नाविकांना बसत असून जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) अद्यापही कोव्हॅक्सिन लशीला मान्यता दिली नसल्यामुळे ही लस घेणाऱ्या भारतीय नाविकांच्या अमेरिका, युरोप आणि आखाती राष्ट्रांतील नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. नाविक आणि कर्मचाऱ्यांना नोकरीवर रुजू होण्यासाठी दिलेली पत्रे मालवाहतूक आणि प्रवासी जहाज कंपन्या परत घेत आहेत. त्यामुळे देशातील हजारो नाविकांचे भवितव्य संकटात सापडले आहे.
देशातील आणि राज्यातील अनेकजण परदेशातील जहाजांवर नोकरीला आहेत. गेल्या वर्षी करोनाची साथ पसरल्यानंतर जहाजांवर असलेले नाविक मायदेशी परतले. जागतिक अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्यावर नाविकांना पुन्हा कामावर रुजू होण्याची सूचना कंपन्यांनी के ली. मात्र त्यासाठी लशीच्या दोन्ही मात्रा घेण्याची अट घालण्यात आली. त्यानुसार अनेकांनी लसीकरण करून घेतले.
यातील काहींनी ‘भारत बायोटेक’ निर्मित ‘कोवॅक्सिन’ लसीची मात्रा घेतली. या लसीला अद्यापही जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नाही.याचा फटका परदेशातील जहाजांवर काम करणाऱ्या भारतीय नाविकांना बसला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली लस घेणे कंपन्यांनी बंधनकारक केले असून कोवॅक्सिन घेतलेल्या नाविकांना रुजू करून घेण्यास नकार दिला आहे. प्रवासी जहाजावरील कर्मचारी पुष्कर निरंतर म्हणाले, ‘‘गेल्या १६ महिन्यांपासून बेरोजगार आहे. ‘रॉयल कॅरेबियन क्रुझ लाईन’ या कंपनीने मे महिन्यात कामावर बोलाविले होते. तोपर्यंत मी कोवॅक्सिन लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या होत्या. या लसीला मान्यता नसल्याने कंपनीने रुजू करून घेण्यास नकार दिला. त्यांनी लसीकरण करून जुलैमध्ये कामावर रुजू होण्यास सांगितले होते.
एकदा लस घेतल्याने आता कोविशिल्ड लस पुन्हा घेता येणे शक्य नाही. त्यामुळे कोवॅक्सिनला मान्यता मिळेपर्यंत कामावर जाता येणार नाही. मात्र तोपर्यंत नोकरी टिकेल की नाही याची शाश्वती नाही.’’ ‘‘गेल्या वर्षीपासून नोकरी नाही. कर्ज काढून दोन वर्षांपूर्वी घर घेतले. आता कोवॅक्सिन लस घेतल्याने इंग्लडमधील कंपनीने मालवाहतूक जहाजावर रुजू करून घेण्यास नकार दिला आहे. ‘डब्लूएचओ’ने मान्यता दिलेली लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केले तरच कामावर रूजू करून घेतले जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे नोकरी कधी मिळेल याची शाश्वती नाही,’’ अशी व्यथा इंग्लड येथील ‘झोडिअॅक मेरिटाईम’ कंपनीत सेकंड ऑफिसर (नेव्हिगेशन) पदावर कार्यरत असलेल्या एस. रंजन नंदा यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेला निवेदन
‘‘देशातील ‘कोव्हॅक्सिन’ लस घेतलेल्या दोन हजारांहून अधिक खलाशांच्या नोकऱ्या सध्या धोक्यात आल्या आहेत. या तरूणांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी ‘कोव्हॅक्सिन’ला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता देणे आवश्यक आहे. याबाबत सरकार आणि डब्लूएचओ यांना निवेदन पाठवले आहे.’’ असे ‘ऑल इंडिया सी-फेरर्स युनियन’चे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांनी सांगितले.
गोंधळाचा फटका… ‘कोव्हिशिल्ड’ची दुसरी मात्रा नेमकी किती दिवसांनी घ्यावी याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले होते. मात्र, ‘कोव्हॅक्सिन’ची दुसरी मात्रा कधी घ्यावी याबाबतच्या धोरणात बदल झालेला नाही. अनेक केंद्रांवर ‘कोव्हिशिल्ड’चा तुडवडा काही काळ निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे केंद्रावर उपलब्ध असलेली लस अनेकांनी घेतली.