दापोली : तालुक्यातील ताडील, सुरेवाडी इथं दोघांवर डुकराने हल्ला केल्यानं एक जण गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला आहे. जखमी असलेल्या व्यक्तीवर दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर गंभीर जखमी असलेल्या वृद्धाला चिपळूण तालुक्यातील डेरवण रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
सुरेवाडी येथील शंकर रहाटवळ (वय – ७४ ) हे आपली गुरे चारण्यासाठी सायंकाळच्या सुमारास रानमाळावरील वडाच्या झाडाजवळ गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत बबन रहाटवळ हे देखील होते.
यावेळी आधीच दबा धरून बसलेल्या डुकराने त्या दोघांवर हल्ला चढवला. अचानक झालेला हल्ल्यामुळे दोघेही आपला बचाव करण्यासाठी पळू लागले.
काय करावे हे दोघांनाही समजेना. अखेर त्या डुकराचा रौद्र अवतार पाहून बबन रहाटवळ हे एका झाडावर चढून बसले. तर शंकर रहाटवळ हे त्या डुकराच्या तावडीत सापडले. त्याने त्यांना गंभीरित्या जखमी केले आहे.
त्यांच्या हातावर, कोपरावर, ढोपरावर तसेच डोक्यावर सुळ्याचा मारा बसला आहे. त्यांच्यावरील जखमा ह्या खोलवर असून त्यांना सुरूवातीला दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी डेरवण येथील रूग्णालयात हलवण्याची माहिती दिली.
तर बबन राठोड हे किरकोळरीत्या जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे तसेच वनविभागाचे RFO, वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक शुभांगी भिलारे व शुभांगी गुरव यांनी तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली होती. वन विभाग जखमींकडून जाबजबाब नोंदवून घेत असून उद्या वनविभाग घटनास्थळावर जाऊन पाहणी करणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.