कोकण पदवीधर मतदारसंघावर खिळल्या सर्वांच्या नजरा
मुंबई : मुंबईसह कोकणातील सर्व पाच जिल्ह्यांतील पदवीधर मतदार संघात भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट व अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी नेमके कोण लढणार या प्रश्नाचे मंथन तीन्ही पक्षांमध्ये सुरु झाले आहे.
महायुतीकडून यंदा निवडणुकीच्या रिंगणात निरंजन डावखरे, संजय मोर की नजीब मुल्ला? असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या येथून भाजपाचे निरंजन डावखरे प्रतिनिधित्व करत असले तरी त्यांच्या विरोधात लढलेले संजय मोरे हे सध्या एकनाथ शिंदेंबरोबर आहेत.
या मतदारसंघात मागच्या वेळी तिसऱ्या स्थानावर राहिलेले नजीब मुल्ला हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत आले आहेत.
निरंजन टकले यांनी या मतदारसंघातून दोन वेळा आमदारकी भूषवली आहे. यंदा ते हॅट्रिक मारणार की तिकीट दुसऱ्याला मिळणार अशी चर्चा रंगली आहे. संजय मोरे हे सुद्धा निवडणुकीसाठी इच्छुक आहे. पण यंदा नजीब मुल्ला यांच्यासाठी अजित पवार आग्रही राहू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नजीब मुल्ला यांनी या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्ती यांनी दिली आहे.
निरंजन डावखरे यांनी २०१८मध्ये सहा वर्षांपूर्वी झालेल्या कोकण पदवीधर मतदार संघांमधून ३२,८०० मते घेतली होती तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले मोरे यांनीही २४ हजार मते घेतली होती.
निरंजन डावखरे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की आम्ही मतदार नोंदणीची तयारी केलेली आहे. ३० सप्टेंबर नंतर ही नोंदणी सुरु होईल. जर पक्षाने आदेश दिला तर मी निवडणूक लढवणारच आहे, असेही डावखरे म्हणाले.
खरेतर ही जागा त्या आधीच्या २०१२ च्या निवडणुकी राष्ट्रवादी काँग्रेससाठी निरंजन डावखरे यांनीच जिंकलेली होती. शिवसेना उबाठा तसेच रा. कॉ. शरद पवार हे दोन्ही पक्षही या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण असते. कारण प्रत्येक वेळी पदवीधरांची नोंदणी पदवी प्रमाणपत्राच्या प्रतीसह नव्याने करून घ्यावी लागते. त्यामुळे जो पक्ष नोंदणीत पुढाकार घेतो, त्याची विजयाची शक्यता वाढते.
२०२४च्या मध्यावर म्हणजेच लोकसभा निवडणुका होऊन गेल्यानंतर आणि विधानसभेच्या निवडणुका होण्याआधी होणारे मतदान या दृष्टीने पदवीधर मतदार संघातील निवडणुकीचे महत्वही वाढले आहे.