‘पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो मान्य‘
मुंबई : कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोघांनीही या जागेवर हक्क सांगितला आहे.
शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत उत्सुक आहेत. तर भाजपाने ही जागा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देण्याचे ठरविले आहे.
दरम्यान, किरण सामंत यांनी आपली या मतदारसंघातून लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
किरण सामंत हे शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार अशी चर्चा होती. मात्र आपण अद्याप तरी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नसल्याचे किरण सामंत यांनी शुक्रवारी संध्याकाळी स्पष्ट केले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघावरून महायुतीतीलच भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांत रस्सीखेच आहे.
मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत हे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून त्याची तयारी देखील सुरू केली आहे.
मात्र भाजपाला देखील ही जागा हवी आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजप या मतदारसंघातून लढण्यास उतरविणार आहे.
दरम्यानच्या काळात सामंत यांना कमळ चिन्हावर लढण्याची भाजपाने ऑफर दिल्याचीही चर्चा होती. मात्र त्यावर अदयाप स्पष्टता आलेली नाही.
किरण सामंत हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचीही चर्चा होती. मात्र शुक्रवार संध्याकाळपर्यंत तरी किरण सामंत आणि फडणवीस यांची भेट झाली नव्हती.
आपण मतदारसंघातून लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असल्याचे किरण सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने विद्यमान खासदार विनायक राउत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
त्यामुळे विनायक राउत विरूद्ध किरण सामंत की नारायण राणे लढणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.