रत्नागिरी – प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयात घडला आहे. रुग्णालयात मयत झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने एका महिला कर्मचाऱ्याने चोरल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी घेतलेल्या झाडाझडतीत हा प्रकार उघडकीस आला आहे. दागिने काढून घेणाऱ्या त्या महिलेला जिल्हाधिकाऱ्यांनी जागच्या जागी सेवेतून काढून टाकले आहे.
सुलोचना गुणाजी पाटील (वय ६८, रा. पाली) यांची नात समिक्षा पाटील यांनी चोरीचा आरोप केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची आजी सुलोचना गुणाजी पाटील यांना १ ऑगस्टला कोरोना पॉझिटीव्ह असल्यामुळे महिला कोविड रुग्णालयात वॉर्ड क्र. ५ मध्ये दाखल करण्यात आले. २ दिवसांनी त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांना वॉर्ड क्र. ९ मध्ये हलविण्यात आले. त्यावेळी त्यांच्या उजव्या हातात २ सोन्याच्या बांगड्या होत्या. ही बाब तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यावेळी उजव्या हाताला इंजेक्शन देण्यासाठी फ्लो लावला असल्याने बांगड्या काढणे शक्य झाले नाही, असे समिक्षा पाटील यांनी तक्रार अर्जात म्हटले होते. ६ ऑगस्टला सुलोचना पाटील यांची प्रकृती खालावली. त्यामुळे महिला रुग्णालयातून अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. या दरम्यान, त्यांच्या हातात असलेल्या सोन्याच्या २ बांगड्या दिसल्या नाहीत, असे समिक्षा पाटील यांचे म्हणणे असून आपण ही बाब तेथील स्टाफच्या निदर्शनास आणून दिली होती. दुर्दैवाने आजीचे निधन झाले, त्या मृतदेहाच्या हातात बांगड्या नव्हत्या, असा आरोप पाटील यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते.
या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी घेतली. सोमवारी ते जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आणि या प्रकाराची सर्व माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या झाडाझडतीत रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी असलेल्या महिलेने ते दागिने काढून घेतल्याचे चौकशीत पुढे आले. या महिलेने त्याबाबतची कबुली देखील दिली आहे. काढून घेतलेले दागिने नातेवाईकांना परत करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटी कर्मचारी असलेल्या महिलेला जागच्या जागी सेवेतून काढून टाकले आहे.