कुंभमेळ्यातून परत येताना अपघात, रत्नागिरीतील तिघांचा मृत्यू

रत्नागिरी : कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळ शनिवारी (१ फेब्रुवारी) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

यामध्ये स. रा. देसाई अध्यापक महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य प्रताप सावंत देसाई यांच्यासह वाहन चालक भगवान झगडे व अक्षय निकम यांचा सामावेश आहे. एकाची प्रकृती गंभीर असून, अन्य तिघे जखमी झाले आहेत.

माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई, निवृत्त शिक्षक रमाकांत पांचाळ, श्रीराम मंदिराचे विश्‍वस्त संतोष रेडीज, किरण निकम, त्यांचे चिरंजीव अक्षय निकम, प्रांजल साळवी आणि वाहन चालक भगवान तथा बाबू झगडे असे ७ जण रत्नागिरीतून कुंभमेळ्यासाठी रवाना झाले होते.

तेथील शाही स्नान आटोपून रत्नागिरीला परतत असताना समोरून येणार्‍या डंपरने इनोव्हा गाडीला धडक दिली. ही धडक इतकी जोरात की गाडीचा पुढील भाग पूर्णत: उद्ध्वस्त झाला आणि दोघांचे जागीच निधन झाले. अक्षय निकम यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर काही वेळाने त्यांचा अंत झाला.

या इनोव्हा गाडीत असलेल्या ७ पैकी प्रताप सावंत देसाई, भगवान झगडे व अक्षय निकम या तिघांचे निधन झाले असून, किरण निकम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. संतोष रेडीज, रमाकांत पांचाळ, प्रांजल साळवी यांना काही प्रमाणात जखमा झाल्या; परंतु त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*